मंगळवार, 17-11-2026
मुख्य संपादकनारायण मनोहर सूर्यवंशीRNI NO: MHMAR/26/A6075
← मुख्यपृष्ठ

पुनावळे येथे कारमधून ५० लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दोघांना अवघ्या ८ तासांत अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई

पुनावळे येथे कारमधून ५० लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दोघांना अवघ्या ८ तासांत अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई

पिंपरी-चिंचवड:
पुनावळे येथील हॉटेल संदिप समोरील सर्व्हिस रोडवर पार्क केलेल्या कारमधून बनावट चावीच्या साहाय्याने तब्बल ५० लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोघा आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या ८ तासांत गजाआड केले आहे. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी करत चोरीस गेलेली ५० लाखांची संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.
​प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) आणि चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय ३०, रा. निघोजे, बेंडाले वस्ती, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
​नेमकी घटना काय?
दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०:५० ते १२:१५ या वेळेत फिर्यादी यांनी आपली कार संदिप हॉटेल पुनावळे समोरील सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर पार्क केली होती. आरोपींनी कारचे लॉक बनावट चावीने उघडून कारमधील ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (क) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
​सीसीटीव्ही आणि कौशल्यपूर्ण तपासातून पर्दाफाश
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार पोलिसांची विविध पथके तपासासाठी तैनात करण्यात आली. पथकांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक अज्ञात व्यक्ती कारचे लॉक उघडून पैशांची बॅग घेऊन जाताना दिसली.
​तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी फिर्यादीसोबत मुंबई येथे पैसे आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले. संशयावरून चारुदत्त बेंडाले याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच ही चोरी घडवून आणल्याचे समोर आले. चारुदत्तने कारची बनावट चावी आणि गाडीत ५० लाख रुपये असल्याची माहिती त्याचा मित्र प्रसाद बनकर याला दिली होती. त्यानुसार प्रसादने कारमधून रोकड पळवली. पोलिसांनी तत्काळ चिंबळी येथून प्रसाद बनकरला ताब्यात घेऊन दोघांकडून चोरीस गेलेली ५० लाखांची संपूर्ण रोकड हस्तगत केली.
​कारवाई करणारे पथक:
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव, सपोआ सुदर्शन राठोड व सपोआ सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​या कारवाईत गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वपोनि संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वपोनि ऋषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, राहुल खिळे यांच्यासह पोलीस अंमलदार विक्रम कुदळ, कृष्णा शितोळे, गोविंद चव्हाण, आशिष बोटके, गणेश सावंत, विनोद वीर, शामसुंदर गुट्टे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे रमेश कारके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.