मंगळवार, 17-11-2026
मुख्य संपादकनारायण मनोहर सूर्यवंशीRNI NO: MHMAR/26/A6075
← मुख्यपृष्ठ

दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसांसह परराज्यातील आरोपी मंचर पोलिसांच्या जाळ्यात; ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसांसह परराज्यातील आरोपी मंचर पोलिसांच्या जाळ्यात; ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

मंचर शहरात बेकायदेशीरपणे गावठी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्या परराज्यातील एका सराईत इसमास दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि मोटारसायकलसह मंचर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीला न्यायालयाने ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
​निघोटवाडी पुलाजवळ रचला सापळा
मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथक नेमले होते. दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २३:३० वाजण्याच्या सुमारास हे पथक मंचर शहरात गस्त घालत असताना, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, निघोटवाडी ब्रिजजवळ, नवीन पुणे-नाशिक हायवे रोडच्या बाजूला बस स्टॉपजवळ एक इसम मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या थांबला असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आहेत.
​माहिती मिळताच तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि संबंधित इसमास मोटारसायकलसह शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्याकडील पिशवीतून दोन गावठी बनावटीची पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एकूण ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
​गुन्हा दाखल, दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू
ताब्यात घेतलेल्या इसमाकडे विचारपूस केली असता, त्याने आपले नाव अमजद अब्दुल सत्तार अन्सारी (वय ५४ वर्षे, सध्या रा. लोणार गल्ली, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे; मूळ रा. कासमपूर गढी, ता. धामपूर, जि. बिजनोर, मध्य प्रदेश) असे सांगितले. ही पिस्तुले कोठून आणली याबाबत चौकशी केली असता, ती त्याचा मित्र सलमान हसन अब्बास सय्यद (रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) याच्याकडून आणल्याचे त्याने सांगितले.
​या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित रघुनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३३९/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(१), २५ आणि भारतीय न्याय संहिता कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी क्र. १ अमजद अन्सारी याला अटक केली असून न्यायालयाने त्याला दि. ९/१०/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील आरोपी क्र. २ सलमान हसन अब्बास सय्यद याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय नाडेकर करत आहेत.
​कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार
सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अंमलदार:
​पोलीस हवालदार संजय नाडेकर
​पोलीस हवालदार शेखर भोईर
​पोलीस हवालदार संतोष औटी
​पोलीस हवालदार नंदकुमार आढारी
​पोलीस हवालदार विजय सरजिने
​पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे
​पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार
​पोलीस कॉन्स्टेबल सुनिल काठे
​पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर
यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.