मंगळवार, 17-11-2026
मुख्य संपादकनारायण मनोहर सूर्यवंशीRNI NO: MHMAR/26/A6075
← मुख्यपृष्ठ

खेड पंचायत समितीत राजकीय तडजोड; राष्ट्रवादीच्या माघारीने 'ठाकरे गटा'चा भगवा फडकला सभापतीपदी गौरी मुऱ्हे, उपसभापतीपदी दिलीप डुबे बिनविरोध; संभाव्य सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम

खेड पंचायत समितीत राजकीय तडजोड; राष्ट्रवादीच्या माघारीने 'ठाकरे गटा'चा भगवा फडकला सभापतीपदी गौरी मुऱ्हे, उपसभापतीपदी दिलीप डुबे बिनविरोध; संभाव्य सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम

खेड ( संपादक नारायण सूर्यवंशी )
तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत अखेर नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी आपले दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापतीपदी गौरी चंदन मुऱ्हे तर उपसभापतीपदी दिलीप राजाराम डुबे यांची बिनविरोध निवड झाली. या घडामोडीमुळे पंचायत समितीतील संभाव्य सत्तापेच टळला असून ठाकरे गटाने सत्ता राखली आहे.
​पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला चुरस निर्माण करत सभापती पदासाठी शिवसेना (उबाठा) कडून गौरी मुऱ्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्रद्धा दत्तात्रय मांडेकर यांनी अर्ज दाखल केले होते. तर उपसभापती पदासाठी ठाकरे गटाचे दिलीप डुबे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे दिनेश हांडे रिंगणात उतरले होते. त्यामुळे मागील वेळेप्रमाणेच यंदाही अटीतटीचा संघर्ष होणार असे चित्र निर्माण झाले होते.
​मात्र, अर्ज माघारीच्या मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी अचानक माघार घेतली. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गौरी मुऱ्हे यांची सभापतीपदी, तर दिलीप डुबे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीच्या या माघारीमुळे तालुक्यातील राजकीय गणितांवर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
​गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी
बिनविरोध निवडीची घोषणा होताच पंचायत समिती प्रांगणात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
​विकासाला गती देणार: नवनिर्वाचित पदाधिकारी
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सभापती गौरी मुऱ्हे व उपसभापती दिलीप डुबे यांनी सांगितले की, तालुक्यातील ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न मार्गी लावणे आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या विकासकामांना गती देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट राहील.
​