एसटी बस व स्थानक परिसरात दागिने लांबवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ४.९० लाखांचे सोने जप्त
मंचर (पुणे ग्रामीण):
एसटी बस स्थानक परिसर आणि धावत्या एसटी बसमध्ये प्रवाशांच्या गळ्यातील व बॅगमधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मंचर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मंचर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पाहिजे/फरार आरोपींवर कारवाई करण्यासाठी गस्त वाढवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, एसटी स्थानकात दागिने चोरी करणारी एक टोळी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंचर एसटी स्टँड परिसरात सापळा रचला. तेथे संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपले नाव अशोक बबन भासले (वय - रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड; सध्या रा. हिवरगाव फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.
पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांसह मंचर एसटी स्टँड आणि बसमध्ये महिलांच्या गळ्यातील तसेच बॅगेतील दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पुढील तीन आरोपींना अटक केली:
१) अशोक बबन भासले (रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड; सध्या रा. हिवरगाव फाटा, ता. श्रीगोंदा)
२) सौ. अश्विनी अविनाश भोसले (रा. माहितळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर)
३) सतिष मधूकर गोरे (रा. शिवाजीनगर, जामखेड, जि. अहिल्यानगर)
आरोपींकडून मंचर पोलीस ठाण्यातील गु.र.नं. १४१/२०२६ आणि गु.र.नं. १२०/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३(२)) मधील चोरीस गेलेले ४ तोळे सोन्याचे दागिने (किंमत रु. ४,९०,०००/-) जप्त करण्यात आले आहेत.
ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि मंचरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक शरद बांबळे, अंमलदार संदीप फड, स्वप्नील गाढवे, हनुमंत ढोबळे, अतुल डेरे तसेच मंचर पोलीस ठाण्याचे सुदाम घोडे, संजय नाडेकर, शेखर भोईर, योगेश रोडे, अजित पवार, विनोद जांभळे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अलिशा शेख यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.