बुधवार, 18-11-2026
मुख्य संपादकनारायण मनोहर सूर्यवंशीRNI NO: MHMAR/26/A6075
← मुख्यपृष्ठ

हेद्रुज पवारवाडीतील आगीत दोन आदिवासी कुटुंबांचे संसार खाक; जयसिंग दरेकरांकडून तातडीची मदत घरकुल मिळेपर्यंत पाठपुरावा करणार; दुष्काळाच्या परिस्थितीत संकटामुळे कुटुंबे हतबल

हेद्रुज पवारवाडीतील आगीत दोन आदिवासी कुटुंबांचे संसार खाक; जयसिंग दरेकरांकडून तातडीची मदत घरकुल मिळेपर्यंत पाठपुरावा करणार; दुष्काळाच्या परिस्थितीत संकटामुळे कुटुंबे हतबल

प्रतिनिधी अमित कुमार टाकळकर
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील हेद्रुज पवारवाडी येथील ठाकरवस्तीमध्ये लागलेल्या भीषण आगीत सोपान बुधा केदारी आणि शिवाजी बुधा केदारी यांची घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत दोन्ही आदिवासी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून अडीच ते तीन तोळे सोने, एक लाख ९० हजार रुपये रोख, इलेक्ट्रिक मोटर, ज्वारीची १२ पोती, तांदळाची सहा पोती, कडधान्य, कपडे आणि संसारोपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले. परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती असताना या मोठ्या संकटामुळे दोन्ही कुटुंबे हतबल झाली असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा आणि पुन्हा संसार उभा करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, मंडल अधिकारी मनिषा सुतार, तलाठी उज्वल लाटे, ग्रामसेवक दीपक तळपे आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी घटनेची माहिती दिली. जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळावी आणि तातडीने घरकुल मंजूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही कुटुंबांना दिलासा दिला. सुमारे दहा हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह ब्लँकेट, चटई, किराणा साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टेपाटील यांच्याशीही संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
घरकुल मिळेपर्यंत पाठपुरावा करणार
आगीमुळे दोन्ही कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी आर्थिक मदत तसेच जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जयसिंग दरेकर यांनी केले. दोन्ही कुटुंबांना शासकीय घरकुल मिळेपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन बबन नथू बच्चे, पोलीस पाटील जयमाला बच्चे, उद्योजक विशाल बच्चे, सोमनाथ डांगले, सुनील डांगले, शंकर चव्हाण, गणेश चव्हाण यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.