मंगळवार, 17-11-2026
मुख्य संपादकनारायण मनोहर सूर्यवंशीRNI NO: MHMAR/26/A6075
← मुख्यपृष्ठ

ओतूर बसस्थानक की खाजगी वाहनतळ? सर्व सामान्य जनतेचा सवाल....

ओतूर बसस्थानक की खाजगी वाहनतळ?  सर्व सामान्य जनतेचा सवाल....

प्रतिनिधी पंकज सरोदे
ओतूर(ता.जुन्नर) बसस्थानक खाजगी वाहनांचे वाहनतळ बनले असून बसस्थानकातून दररोज राजरोसपणे प्रवासी वाहने भरली जातात.नगर कल्याण महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.यामुळे खाजगी वाहनांची रेलचेल वाढली असून बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांनी वाहनतळ केले आहे.दिवसभर बसस्थानक आवारात वाहने लावून त्यात प्रवासी भरले जातात शिवाय या खाजगी वाहनाने प्रवास करणे धोकादायक असताना देखील या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात.आधीच नगर कल्याण महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.दिवसेंदिवस या मार्गावर अपघात होतात त्यात ही खाजगी वाहने प्रवासास कितपत सुरक्षित आहेत ? हा सवाल सध्या उपस्थित होतोय.तर वाहन चालक देखील प्रवाशांच्या जीवावर बेतेल अशी वाहने बेदरकारपने चालवताना या महामार्गावर दिसत आहेत.हा सर्व बेकायदेशीर धंदा अगदी खुलेआम सुरू असताना यांना नक्की कोणाचे अभय आहे हा सवाल सामन्यांमध्ये उपस्थित होतोय.या वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे.
संबंधित विभागाने यावर उपाय योजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजसेवी संस्थांनी दिला आहे.]
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी जनतेच्या मागणीवरुन प्रवाशांच्या सोईकरिता नागरी सुविधा अंतर्गत बसस्थानकातील रस्ते करणेसाठी सुमारे २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आणि हा रस्ता देखील झाला मात्र या रस्त्यावर प्रत्यक्ष वाहने ये जा करण्यासाठी अतिशय अपुरी जागा असते आणि दुतर्फा खाजगी वाहने उभी करून ठेवली जातात हा रस्ता म्हणावा की पार्किंगची सोय ? असा प्रश्न पडत आहे.
मुळातच ओतूर बसस्थानक हे अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात असून बसस्थानकाला प्रत्यक्ष वापरायला अत्यल्प जागा उपलब्ध आहे.गेली अनेक वर्षे हे बसस्थानक अद्यावत करण्याची आग्रही मागणी असताना देखील या मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे की काय अशी शंका निर्माण होते. प्रवाशांची रेलचेल असणारे आणि कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील महत्वाचे बसस्थानक असताना येथे सुविधांचा अभाव दिसून येतो.ज्येष्ठ नागरिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि महिलांना देखील गैरसोयीचे बनत चाललेल्या ओतूर बसस्थानकाला लवकरात लवकर मुहुर्त साधावा अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
[अनेक दिवसांपासून हे बसस्थानक दुर्लक्षित असल्याने या गोष्टी जाणीवपुर्वक होत असल्याचाही होतोय आरोप.मात्र या मागचे मास्टर माईंड कोण ? ]