मंगळवार, 17-11-2026
मुख्य संपादकनारायण मनोहर सूर्यवंशीRNI NO: MHMAR/26/A6075
← मुख्यपृष्ठ

इंदापूर तालुक्यातील सराईत धोकादायक गुन्हेगार अंबादास पवार MPDA कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध!

इंदापूर तालुक्यातील सराईत धोकादायक गुन्हेगार अंबादास पवार MPDA कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध!

इंदापूर:
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक व धोकादायक ठरत असलेल्या सराईत गुन्हेगारावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कायदेशीर कारवाई केली आहे. खूनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी व बेकायदा शस्त्र बाळगण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अंबादास तायप्पा पवार यास एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
​पोलिसांची कठोर पावले आणि पार्श्वभूमी
​पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये मागील ५ वर्षांत दाखल गुन्ह्यांमधील जामिनावर सुटलेले आरोपी आणि त्यांच्यावर पुन्हा दाखल होणाऱ्या गंभीर गुन्हेगारी रेकॉर्डचे अद्ययावतीकरण करण्याचे आदेश मा. श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलिसा अधीक्षक, पुणे ग्रामीण) यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार दरोडा, खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी व अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
​गुन्हेगाराची पार्श्वभूमी व प्रस्ताव
​वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील अंबादास तायप्पा पवार (वय ३८) याच्याविरुद्ध सन २०११ पासून २०२६ पर्यंतच्या काळात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये:
​बेकायदा गर्दी जमवून जातीवाचक शिवीगाळ करणे
​दरोडा आणि दरोड्याची पूर्वतयारी करणे
​अवैध अग्निशस्त्र जवळ बाळगणे
​संगनमत करून जबरी चोरी व खंडणी मागणे
​संगनमत करून प्राणघातक हत्यारांनी खूनाचा प्रयत्न करणे
​लोकसेवकावर हल्ला करून शासकीय कर्तव्यात अडथळा आणणे
​अशा विविध कलमांन्वये एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सराईत व धोकादायक असल्याने त्याच्यावर MPDA कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. गोपाळ पवार यांनी पोलीस अधीक्षक साहेबांकडे सादर केला होता. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक साहेबांच्या शिफारशीनुसार मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी यांनी सदर गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.
​अशी केली कारवाई
​मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गोपाळ पवार व त्यांच्या पथकाने विशेष पथके तयार करून शोध घेतल्यानंतर दिनांक १५/१०/2026 रोजी आरोपी अंबादास तायप्पा पवार यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
​मार्गदर्शन व यशस्वी कामगिरी
​सदरची धडक कारवाई मा. श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलिसा अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग), आणि मा. चैतन्य कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
​या पथकात पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व वालचंदनगर पोलीस ठाण्यातील अंमलदार यांनी सहभाग घेऊन ही यशस्वी कामगिरी केली आहे.