खेड तालुक्यात मोठी कारवाई! राक्षेवाडीतील घरफोडी प्रकरणाचा छडा; साडेचार लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत
खेड / प्रतिनिधी: मनोहर गोरगले
खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राक्षेवाडी येथील साई योग अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणाचा खेड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणी एका आरोपीसह विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ४,९५,६५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी मौजे राक्षेवाडी येथील साई योग अपार्टमेंटमध्ये राहणारे फिर्यादी निलेश बापू जांभळे (वय ३९ वर्षे) यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केला होता. कपाटातील अंदाजे ४,९५,६५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिरेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक इस्माइल तांबोळी यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
पोलिसांची चक्रं कशी फिरली?
गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेऊन खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साहील भांबुरे आणि एक विधीसंघर्षित बालक यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांनाही ताब्यात घेतले.
तपासादरम्यान त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये दोन तोळे ते अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण, विविध डिझाईन्सचे सोन्याचे कानातले, सोन्याची चेन, अंगठ्या तसेच चांदीचे ब्रेसलेट, पैंजण आणि मनगटीचे जोड असा एकूण ४,९५,६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शन
सदरची यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, खेड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली, खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुभाष चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राउळ, पोलीस उपनिरीक्षक इस्माइल तांबोळी, पोलीस हवालदार संतोष घोलप, पोलीस अंमलदार महेश गोसावी, सुरज राक्षे आणि संकेत कवडे यांच्या पथकाने पार पाडली आहे. खेड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.