अखेर डाळिंब येथील खळबळजनक खुनाच्या गुन्हयाची उकल; आरोपी जेरबंद
यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त धडाकेबाज कामगिरी
पुणे (प्रतिनिधी) : दौंड तालुक्यातील डाळिंब येथे ३ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या एका युवकाच्या अपहरणा आणि खुनाच्या गुन्ह्याचा पुणे ग्रामीण पोलिसांनी यशस्वी उकल केला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
घटनेची पार्श्वभूमी:
दिनांक ०३/१०/२०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास डाळिंब (ता. दौंड) येथील ५१ वर्षीय महिला नंदा धोंडीबा खंडागळे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, त्यांचा ३५ वर्षीय मुलगा भिमाशंकर धोंडीबा खंडागळे याचे अज्ञात कारणासाठी व अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती (यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. १०१२/२०२६, भा.न्या.सं. कलम १४०(३)).
मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ:
अपहरणाचा तपास सुरू असतानाच, दिनांक ०८/१०/२०२६ रोजी डाळिंब हद्दीतील रमेश म्हस्के यांच्या विहिरीत फिर्यादी यांच्या मुलाचा (भिमाशंकर खंडागळे) कुजलेला मृतदेह आढळून आला. आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे हात-पाय लोखंडी तारेने बांधून व मृतदेहास मोठा दगड बांधून तो विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला. यानंतर या गुन्ह्यात भा.न्या.सं. कलम १०३(१), २३८ नुसार कलमवाढ करण्यात आली.
खुनाचे गूढ उकलले; आरोपी गजाआड:
यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून तपास सुरू ठेवला. यादरम्यान, दिनांक १५/१०/२०२६ रोजी संशयित इसम विजय सुभाष लेचरूड (वय ४० वर्षे, रा. डाळिंब, ता. दौंड, जि. पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, मयत भिमाशंकर खंडागळे याने आरोपीस किरकोळ शिवीगाळ केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने भिमाशंकर याचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हात-पाय लोखंडी तारेने व मृतदेहाला मोठा दगड बांधून विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली. आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करीत आहेत.
पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी:
सदरची अत्यंत महत्त्वाची व गुंतागुंतीची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक (पुणे विभाग) मा. डॉ. शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) मा. श्री. गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी (दौंड) मा. श्री. बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. संतोष तासगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, अक्षय मोरे, दशरथ नंदीवाले, ज्ञानेश्वर राउत, बाळासो थिकोळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.